लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ अल्प प्रमाणात घेतला जात आहे. त्या उलट हेल्पलाईनकडूनच कोरोनाबाधित रुग्णांना कॉल करून त्यांची तब्येत, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसुविधा व अन्य बाबींबाबत माहिती विचारण्यात येते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. तरीही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी न होता उलट त्यामध्ये वाढ झाली होती. केंद्र आणि राज्य शासनाने कोरोनाच्या संबंधित माहिती आणि त्याबाबतचा सल्ला लोकांना सहजरित्या उपलब्ध व्हावा, यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले. लाेकांचे शंका निरसन करता यावे, त्यांना योग्य माहिती मिळावी, यासाठी जिल्हास्तरावरही आरोग्य विभागाकडूनही हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७,९२६ झाली असून ५०,५५४ रुग्ण बरे झाले आहेत,, तर १,६६७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ५,७०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या माहितीसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून २४ एप्रिल, २०२१ पासून हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत आतापर्यंत सुमारे १२५ लोकांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. तसेच हेल्पलाईन नंबरवरुन तज्ज्ञांकडून प्रत्येक तालुक्यात सुमारे ५० रुग्णांशी संपर्क साधण्यात येतो. आतापर्यंत एकूण १९,८३६ रुग्णांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामध्ये होम आयसोलेशनबाबत नियम समजावून सांगतानाच घ्यावयाची काळजीविषयी रुग्णांना सविस्तर माहिती देण्यात येते. मात्र, हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
रुग्णांना सल्ला
हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधलेल्या लोकांनी ताप, सर्दी, खोकला, वास न येणे तसेच अशक्तपणा येतो याबाबत लोकांनी विचारणा केली. त्यांना या हेल्पलाईनकडून योग्य तो सल्ला देण्यात आला. तसेच त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधण्यास सांगून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार कसा लवकर मिळेल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीसाठी आशा वर्कर किंवा आरोग्य कर्मचारी घरी येतात का, टेम्परेचर, ऑक्सिजन पातळी तपासली जाते का, घरात इतर कोणी पॉझिटिव्ह आहे का, आहार, वाफ घेणे, गरम पाणी पिणे, औषधांबाबत, व्हॅक्सिनेशन, सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतर, लक्षणे नसली तरी काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत माहिती घेऊन रुग्णांना योग्य सल्ला देण्यात येतो.
.........................
- हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून व्हॅक्सिनेशनबाबत माहिती विचारण्यात येते. तसेच डेडबॉडीसाठी ॲम्ब्युलन्सच्या उपलब्धेबद्दल विचारणा करण्यात येते.
- रुग्णालयातील स्वच्छता नसल्यास त्याबद्दलही रुग्णांकडून तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून विचारणा करण्यात येते. संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना देण्यात येते.
- काही वेळा तर जेवणाच्या दर्जाबाबतही सांगण्यात येते. तसेच कोरोनाच्या लक्षणांबाबतही लोकांकडून विचारणा केली जाते.
तारीख कॉल्स रुग्ण
१ मे ------- ३ -------- ५२०
१५ मे ------ ३ --------- ५०२
१ जून ------ ६ --------- ६५५
१५ जून------ ० --------- ५७८
२० जून------ १ --------- ४५७
दुसऱ्या लाटेत आलेले कॉल्स- १२५