खाडीपट्टा : खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागातील इंदिरा आवास घरकुल योजनेचे गरजू लाभार्थी गेली दोन वर्षे हक्काच्या निवाऱ्यासाठी शासन दरबारी पायपीट करीत आहेत. पण, जिल्हा परिषदेत हे प्रस्ताव मंजुरीसाठी धूळखात पडल्याने ऐन पावसाळ्यात हे गरजू लाभार्थी निवाऱ्यासाठी शासनाचे दरवाजे ठोठावत आहेत. खाडीपट्ट्यातील कर्जी ग्रुप ग्रामपंचायतीतील सुमारे ३५ ते ४० गरजू इंदिरा आवास निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. खेड खाडीपट्टा हा विभाग तालुक्यातील अतिमहत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. सद्यस्थितीला हा विभाग विकासाच्या मार्गावरुन मार्गक्रमण करीत आहे. तरीही खाडीपट्ट्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंब आजही गरिबीचे व हलाखीचे जीवन जगत आहेत. बदलत्या कामानुसार या गोरगरिबांच्या जीवनमानात होणारा बदल व आवश्यक अशी प्रगती झालेली दिसून येत नाही. आजही ही कुटुंब अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी झगडताना दिसून येत आहेत.दारिद्र्यरेषेखालील लोकांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ही योजना सुरू झाली. परंतु, या योजनेतून लाभ मिळविण्यासाठी गरजू लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. प्रस्ताव वेळेत देऊनही घरकुल वेळेत मंजूर न झाल्याने घरकामासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची दरवाढ होऊन या लाभार्थीना दरवाढीचा फटका बसतो व नुकसान सहन करावे लागते.आता कोणत्याही दिवशी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर झाली की लाभार्थींना आणखी ५ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आचारंसहितेपूर्वी निवाऱ्याची मंजुरी देणार का? असा सवाल होत आहे. (वार्ताहर)व्यथा कायम...खाडीपट्टा भागातील इंदिरा आवास घरकुल योजनेच्या लाभार्थींची गेली दोन वर्षे हक्काच्या निवाऱ्यासाठी शासन दरबारी पायपीट.खाडीपट्ट्यातील कर्जी ग्रुप ग्रामपंचायतीतील सुमारे ३५ ते ४० गरजू लोक अद्याप इंदिरा आवासच्या निवाऱ्याच्या प्रतीक्षेत.प्रस्ताव वेळेत देऊनही घरकुल वेळेत मंजूर न झाल्याने लाभार्थींमध्ये नाराजी.
हक्काच्या घरासाठी लाभार्थींची धडपड
By admin | Published: September 10, 2014 10:41 PM