लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मागील चार वर्षांत वाढ झालेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांमधील सुशिक्षितपणामुळे आज कोणीही मुलींचा जन्माला नकार देत नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून १,००० मुलांमागे ९५२ मुली आहेत. त्यामुळे वंशाच्या दिव्यापुढे बेटी बचाव अशी जनजागृती मुलींच्या जन्मासाठी फायद्याचीच ठरली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुला-मुलींच्या जन्मदराबाबत दिलेल्या माहितीवरुन गेल्या तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मुलींच्या जन्मदरात आधीपासूनच पुढेच आहे. सन २०१७-२०१८ मध्ये जन्मलेली मुले-९,०८३, मुली-८,३८४. सन २०१८-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,८३२, मुली- ८,८३७ आणि सन २०१९-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,१९७, मुली-७,८०४ अशी संख्या आहे. मुलींचा जन्मदर ९४४ वरुन ९५२ वर गेला आहे.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात सुशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येसारखे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडतच नाहीत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही मुलीच्या जन्माचे स्वागत तेवढ्याच उत्साहाने केले जाते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कुठेही केला जात नाही म्हणूनच मुलींच्या जन्मदरात जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे.
लिंग निदानास बंदी
गर्भनिदान प्रतिबंधक कायदा रत्नागिरी शहरामध्ये कडकपणे राबविला जातो. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्रे बेकायदेशीरपणे चालविली जातात, असे म्हटले जाते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्र नाहीत. जिल्ह्यात लिंग निदान तसेच गर्भपातासारखे प्रकार पुढे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात मुलींची जन्मसंख्या वाढत आहे.
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढत चालला आहे, ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मोठे योगदान आहे. लिंग निदान तसेच भ्रृणहत्या अशा प्रकारापासून रत्नागिरी जिल्हा दूरच आहे. आरोग्य विभागाकडूनही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मुलींची संख्या कमी झाल्यास अनेक मुलांना विनालग्न राहावे लागणार आहे. त्यामुळे मुलींची जन्मदर कमी झाल्यास त्याचे परिणामही भावीपिढीला भोगावे लागणार, हे निश्चित आहे.