लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : फेसबुकवर फ्रेंड लिस्ट कोणाची मोठी हा सध्या तरुणांमधील प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. ही मैत्रयादी वाढविण्याच्या नादात अनेकदा अनोळखी लोकांसमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला जातो आणि अनोळखी लोकांचा प्रस्ताव स्वीकारलाही जातो. मात्र, हीच मैत्री कधीतरी अडचणीत आणू शकते. अनोळखी मैत्रीतून गप्पा आणि त्यातून अलगद विणले जाणारे जाळे (हनी ट्रॅप) यात तरुणाई अडकत आहे. रत्नागिरीतही असे सात ते आठ प्रकार घडले आहेत.
काहीवेळा मोठे आर्थिक आमिष दाखवून तर काहीवेळा सौंदर्याचा वापर करुन फेसबुकवरुनही फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्याचे फेसबुकवर अधिक मित्र-मैत्रिणी तो जास्त प्रसिद्ध, अशी ‘क्रेझ’ आज तरुण पिढीमध्ये आहे. मात्र, अनोळखी लोकांशी झालेली मैत्री अनेक अर्थांनी महाग पडू शकते. त्यामुळे अशा मैत्रीमध्ये जास्त मोकळेपणा न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अशी झाली फसवणूक
एका तरुणाला फेसबुकवर मुलीची रिक्वेस्ट आली, त्या तरुणाने मुलगी अनोळखी असतानाही ती स्वीकारली. त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. मुलीने चॅटिंगचा आधार घेऊन ब्लॅकमेल करणे सुरू केले, तेव्हा तो तरुण घाबरून पोलिसात गेला.
फेसबुकवर चॅट
२० ते ३५ या वयोगटातील तरुण-तरुणींना लक्ष्य करून त्यांना हॅनी ट्रॅप या प्रकारात फसवले जाते. तरुणींना तर अशा प्रकारांमध्ये अधिक धोका असतो. फेसबुकवर चॅटिंग करताना सावध राहणे गरजेचे आहे, अशी सूचना सायबर पोलिसांनी केली आहे.
बदनामीच्या भीतीमुळे गुन्हेगारांचे फावते
फेसबुकवर ओळख झाल्यावर नंबर मागायचा, छान गप्पा मारायच्या, हळूच जाळ्यात ओढायचे. व्हिडीओ काॅल करून आक्षेपार्ह काॅल रेकाॅर्ड करून बदनामी करण्याची धमकी देत पैसे मागायचे, यामुळे लोक तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.
.........................................
अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारू नये. आपली फसगत होत आहे, हे लक्षात आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा. त्या व्यक्तीची पैशाची मागणी पूर्ण करून गुन्हेगारांना आणखी गुन्हा करण्यास एकप्रकारे प्रवृत्त केले जाते. त्यामुळे पैशांची मागणी पूर्ण करू नका.
- नितीन पुरळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक
......................
असे ओढले जाते जाळ्यात
हनी ट्रॅप हा एक साेशल मीडियावरील फसवणुकीचा नवीन प्रकार आहे. यामध्ये एखादा सायबर गुन्हेगार फेसबुकच्या माध्यमातून पीडित व्यक्तीला ऑनलाईन संपर्क करतो आणि फेसबुक मॅसेंजर ॲपव्दारे चॅट सुरू करून पीडित व्यक्तीला भुरळ पाडतो व गप्पा मारणे, पोस्ट लाईक करणे, त्यानंतर व्हाॅट्सॲप नंबर घेणे असा प्रवास होतो. दिवसभर चॅट करणे व त्यातून व्हिडीओ चॅट करणे या त्याच्या पुढील पायऱ्या आहेत.