लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यातच सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहण्यामुळे झोप गायब झाली आहे. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे विविध आजार बळावत असून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ लागली आहे.
सर्वसाधारणपणे लहान मुलांना १० ते १२ तास तर प्राैढांना किमान ६ ते ८ तास झोपेची गरज असते. मात्र, सध्या नोकरी-धंद्यानिमित्त दगदग वाढल्याने झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत आहे.
अपुऱ्या झाेपेचे ताेटे
झोप अपुरी झाली तर उत्साह कमी होतो आणि करताना मरगळ जाणवते. सुस्तपणा वाढतो.
झोप मिळाली नाही तर रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार वाढतात.
अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते.
राेगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराची ढाल...
व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कुठल्याही आजाराचा संसर्ग लगेचच होतो. संतुलित आहार, पुरेशी निद्रा आणि व्यायाम त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.
संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक
निराेगी आयुष्यासाठी व्यक्तीला पुरेशी झोप त्याचबरोबर संतुलित आहार आणि नेहमी व्यायाम आवश्यक आहे. परंतु सध्या बैठे काम, कामाचा ताण आणि बाहेरील खाणे यामुळे व्यक्तीची दिनचर्या बदलली आहे. यामुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाबासारखे विकार जडू लागले आहेत. त्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप गरजेची आहे.
किमान सहा तास झाेप आवश्यक डाॅक्टरांच्या मते, आरोग्य चांगले रहाण्यासाठी व्यक्तीला किमान सहा तासांची शांत झोप मिळणे गरजेचे असते. अपुरी झोप झाल्यास दिवसभर निरूत्साह जाणवतो. थकवा जाणवतो. त्याचबरोबर रक्तदाब, डोळ्यांचे विकार वाढतात. व्यक्तीला भविष्यात निद्रानाशासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य चांगले रहाण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.
चांगली झोप झाल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. त्यासाठी योग्य वेळेत झोपणे आणि सकाळीही वेळेत झोपणे आवश्यक असते. अवेळी झोपही आजाराला आमंत्रण देणारी असते. अधिक झोप झाली तर वजन वाढते. झोपेबरोबरच सकस आहार आणि नियमित व्यायामही गरजेचा असतो. ही त्रिसुत्री जपल्यास व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते.
- डाॅ. कल्पना मेहता, आहारतज्ज्ञ, रत्नागिरी.