लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात आता पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रकार वाढणार आहेत. मात्र, प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे साप दिसताच घाबरून न जाता त्याच्यावर लक्ष ठेऊन सर्पमित्रांना बोलावून त्याला पकडल्यास सापांच्या प्रजाती वाचण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात सुमारे ५२ प्रजाती आढळतात. त्यापैकी किंग कोब्रा आणि पट्टेरी मण्यार वगळता उर्वरित बहुतांशी साप कमी-अधिक प्रमाणात दिसतात. विषारी प्रजातींपैकी नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच प्रजाती रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात. फुरसे तर केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत आढळते. उर्वरित बिनविषारी सापांपैकी सुमारे १६ ते १७ प्रजाती रत्नागिरीत बहुतांशी सापडतात. त्यात मोठ्या प्रमाणावर सापडणारी धामण, कवड्या आदी प्रजाती होत. धामण तर उंदीर या भक्ष्याच्या शोधात शेतात किंवा घरानजिक वावरत असते. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने हे साप आसऱ्यासाठी घराजवळ येतात. त्यामुळे ये-जा करताना सावधगिरी बाळगा, त्यांना घाबरून मारू नका, असा सल्ला सर्पमित्र देतात.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग हा साप पाच ते साडेपाच फूट लांबीचा असतो. त्याच्या डोक्यावर मोडी लिपीतील दहा आकडा असतो. त्याला एकाक्ष नाग (स्पेक्टॅकल कोब्रा) असेही म्हणतात.
मण्यार हा एक विषारी साप आहे. हा जंगलात राहतो. संपूर्ण काळ्या रंगाचा असून, त्यावर पांढरे गोल पट्टे असतात. त्याची साडेतीन ते चार फूट लांबी असते.
घोणस या विषारी सापाची लांबी चार ते साडेचार फूट असते. अजगरासारखा जाडजूड व चिडल्यावर कुकरसारखी शिटी देतो.
फुरसे हे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत आढळते. इतर विषारी सापांच्या तुलनेने हा साप कमी विषारी असतो. याने दंश केल्यास दगावण्याचे प्रमाण कमी असते.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
साप आढळला तर
जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी बिनविषारी साप आढळतात. त्यांची लक्षणे ओळखता येणे गरजेचे.
बिनविषारी साप हे विषारी सापापेक्षा चपळ असतात. मात्र, लगेचच दंश करतात.
अचानक साप आढळला तर स्तब्ध उभे रहा. आपण हलल्यावर साप दंश करण्याचा धोका अधिक.
घराशेजारी साप दिसल्यास, कुठे आहे, त्यावर लक्ष ठेवा आणि सर्पमित्राला पकडण्यासाठी बोलवा.
साप चावला तर
आपल्याकडे बहुतांशी बिनविषारी साप आढळतात. त्यामुळे एखाद्या सापाने दंश केल्यास प्रथमत: घाबरू नये.
सापाला न मारता सर्पमित्राच्या सहाय्याने पकडून आणल्यास निदानाला मदत होते.
दंश केलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर थोडीशी आवळलेली अशी पट्टी बांधावी.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शासकीय दवाखान्यात दाखल केल्यास वेळेवर उपचार होऊन प्राण वाचेल.
सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. बिनविषारी साप ओळखता आला तर मनात भीती राहणार नाही आणि सापांनाही जीवदान मिळेल. विषारी आहे, असे वाटल्यास लागलीच सर्पमित्राला बोलवा, तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा.
- ज्ञानेश म्हात्रे, सर्पमित्र, रत्नागिरी