रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील बसस्थानकासह व्यापारी संकुलाचा भूमिपुजन समारंभ दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मध्यवर्ती बसस्थानक येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.बसस्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या व ग्रामीण गाड्यांसाठी १४ फलाट तर शहरी मार्गावरील १० फलाट तळमजल्यावरती बांधण्यात येणार आहे. ३८ हजार चौरस फुटाचे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. बसस्थानकामध्ये चालक - वाहक विश्रांतीगृह, स्थानकप्रमुख कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, अधिकारी अतिथीगृह उभारण्यात येणार आहे. संकुलामध्ये तळमजल्यावर ५० हजार लिटरची पिण्याच्या पाण्याची टाकी व पहिल्या मजल्यावर २५ हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. बसस्थानकामध्ये फळांचे स्टॉल, मनोरंजन हॉल, कृषी साहित्य विक्री केंद्र व तत्सम व्यावसायिकांसाठी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा असलेला बसस्थानकाचा प्रकल्प १७ कोटीचा असल्याचे विभाग नियंत्रक देशमुख यांनी सांगितले.भूमिपूजन सोहळा राज्याचे परिवहन मंत्री मधुकर चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा जाधव, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
बसस्थानक, व्यापारी संकुलाचे आज भूमिपूजन
By admin | Published: September 07, 2014 12:32 AM