रत्नागिरी : शहरातील निसर्गप्रेमी व भैरी भक्त यांच्या संकल्पनेतून आणि मंदिराचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीचा गाभारा हा विविध फुलझाडांनी सजविण्यात आला हाेता. त्यामुळे भैरीबुवाचा गाभारा हिरवाईने सजलेला दिसत हाेता.रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवाच्या गाभाऱ्याला विविध प्रकारची शाेभनीय सजावट केली जाते. थंडीच्या दिवसात भैरीबुवाला कान टाेपरी, द्राक्ष, आंबे यांची सजावट तर कधी भरगच्च फुलांचीही सजावट केली जाते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फुलझाडांनी गाभारा सजविण्याची संकल्पना मांडण्यात आली. पर्यावरणप्रेम व निसर्गाप्रती असलेली आपुलकी जपणारा हा उपक्रम प्रथमच रत्नागिरीतील भैरी मंदिरात साजरा करण्यात आला. मंदिरात सकाळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी फुलझाडे श्रीदेव भैरी चरणी अर्पण केली. त्यामुळे भैरीबुवाचा गाभारा फुलझाडांनी सजलेला दिसत हाेता. विविध प्रकारच्या फुलझाडांमुळे गाभारा जणे हिरवाईने सजला हाेता. संकलित फुलझाडांनी गाभाऱ्याची सजावट करून दुसऱ्या दिवशी त्याची लागवड केली जाणार आहे. मंदिर परिसरात ही लागवड केली जाणार असून, त्याचे संगाेपनही मंदिर ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून भैरी ट्रस्टने पर्यावरण जपण्याचा जणू संदेश दिला आहे.
भैरीबुवा सजला फुलझाडांनी; पर्यावरण दिनी पर्यावरणपूरक सजावट
By अरुण आडिवरेकर | Published: June 05, 2023 2:31 PM