सावर्डे : चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागर या तीन तालुक्यातील जनतेला सोयीस्कर असलेल्या दुर्गम भागातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती पाहता ते सलाईनवर चालत आहे, अशी स्थिती आहे. २५ हजार लोकसंख्या आणि १९ गावांच्या कार्यक्षेत्रातील ८पैकी ५ उपकेंद्रांना स्वमालकीच्या इमारती नाहीत. यामुळे येथील आरोग्य सुविधा ना घर का ना घाट का अशी विदायक स्थिती होऊन बसली आहे.येथील सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दिवसेंदिवस राम भरोसे चालला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. १९ गावांतील ८ उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवकांनी कार्यक्षेत्रातील गावात राहाणे बंधनकारक असतानाही सर्व कर्मचारी शहरात राहात असल्याने रात्री-अपरात्री प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अन्य खासगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्य खात्याने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या आरोग्य केंद्राचा उद्देश सफल होताना दिसत नाही.शासनाच्या विविध योजना, विनामूल्य व माफक दरात असताना कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्राथमिक दर्जाच्या व प्रसुतीसारख्या सुविधांचा व योजनांचा लाभ योग्य वेळेत या यंत्रणेकडून मिळत नसल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो.या केंद्रांतर्गत असलेली कळंबट व निवळी ही उपकेंद्र स्वमालकीच्या इमारतीत आहेत. परंतु आबिटगाव, नायशी, वीर, पिलवली, मुर्तवडे ही पाच उपकेंद्र संबंधित गावामध्ये भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये दररोज १००हून अधिक बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. या केंद्रामध्ये २ वैद्यकीय अधिकारी, २ आरोग्य सहाय्यक (पुरुष), एक आरोग्य सहाय्यक महिला, १ आरोग्यसेवक, १ कनिष्ठ सहाय्यक वाहनचालक, ३ परिचर, १ महिला परिचर, सफाई कामगार असे १४ कर्मचारी कार्यरत आहेत. निवास व्यवस्था पुरेशी नसल्याने येथील १४पैकी ९ कर्मचाऱ्यांनी खासगी निवासस्थानाचा आश्रय घेतला. शवविच्छेदन करताना कटरची नेमणूक नाही. प्रयोगशाळा, साधन सामुग्री व तंत्रज्ञ यांचा अभाव आहे. येथील शवविच्छेदन खोलीला गळती लागली असून, परिसरात गवताचे आच्छादन वाढले आहे. पुरेशी लाईट व्यवस्था नाही. गवत, झाडेझुडपांनी या केंद्राचा काही भाग वेढलेला आहे. या केंद्रांतर्गत आजपर्यंत ५०हून अधिक प्रसुती झाल्या आहेत. अतिशय दुर्गम भागात असलेले हे आरोग्य केंद्र सामान्य जनतेसाठी वरदान ठरले असले तरी येथे असणाऱ्या रुग्णसुविधांच्या अभावामुळे हे केंद्र सातत्यपूर्ण चर्चेत येत आहे. (वार्ताहर)
वहाळ आरोग्य केंद्र सलाईनवर
By admin | Published: August 29, 2016 10:06 PM