रत्नागिरी : खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण ८,००० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खत विक्री करू नये, यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे.
कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकरी तत्काळ रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकतात किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात युरिया खताची मोठी मागणी आहे. कृषी सेवा केंद्रात जर जास्त दराने खत विक्री करत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत. मात्र, त्यासाठी लेखी तक्रार येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सर्व खत विक्री केंद्रे, ग्रामीण सोसायट्यांपर्यंत खत पुरवठा सुरू झालेला आहे. त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना खताची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ८,००० मेट्रिक टन इतका खतसाठा उपलब्ध झाल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके गुणवत्ता भावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पथकप्रमुख जिल्हा परिषद कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्या नेतृत्वाखाली खत विक्री सेवा केंद्र व कृषी विषयक सेवा केंद्रांना भेटी देऊन तेथील तपासणी केली जात आहे. खतविक्रीबाबत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.