चिपळूण : भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता) असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे (६७) यांनी केला आहे. चालत भारतभ्रमण केल्यास खरा भारत समजेल या भावनेतून त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे.
दि.३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी साबरमती आश्रमातून पदयात्रेस प्रारंभ केला आहे. दि.१७ नोव्हेंबरला त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मनोर-वसई-घोडबंदर-ठाणे-पनवेल-पेण- वडखळ-नागोठणे-इंदापूर-माणगांव-महाड-भरणा नाका-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा तिठा-राजापूर-कुडाळ-सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात ते प्रवेश करणार आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी काश्मिर ते कन्याकुमारी असे ४ हजार ५०० किमी अंतर चालून पूर्ण केले.
६३ व्या वर्षी या पदयात्रेतील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. ६४ व्या वर्षी किबीतू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर (गुजरात) अशी ४ हजार २०० किमीची पदयात्रा पूर्ण केली व त्या पदयात्रेच्या अनुभवावर आधारित पुस्तक ६५ व्या वर्षी प्रकाशित केले. एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा वयाच ६७ व्या वर्षी भारताचा समुद्र किनारा व त्याहून महत्त्वाचे साबरमती आश्रम (गुजरात) महात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे.