Shivsena UBT Bhaskar Jadhav ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. मात्र त्याचवेळी आमदार जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याची खदखदही जाहीरपणे बोलून दाखवली. असं असलं तरी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना भास्कर जाधव म्हणाले की, "मी उद्धव ठाकरे यांच्यासाठीच लढतो आहे. परंतु मला मंत्रिपद मिळालेले नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गटनेतेपदही मिळालेलं नाही. ते यापुढेही मिळणार नाही, हे मला माहीत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं. ते मिळणं हा माझा हक्क होता," अशा शब्दांत जाधव यांनी आपल्या मनातील खंद बोलून दाखवली.
शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी माहिती देताना भास्कर जाधव यांनी म्हटलं की, "पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवे होते? विधानसभेत कुणाचा आवाज आहे? याची चर्चा सुरू होती. मी इतरांप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कुणालाही सांगत नाही. मात्र आज सांगायची वेळ आली आहे. तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही भाजप सोबत गेला तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नाही, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. सगळे गेले तरी चालतील, मात्र आपण दोघांनी राहायचं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आज मी लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी," असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत," असं म्हणत काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावल्याने ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं आज भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.