चिपळूण: योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते. हेच माझ्या बाबतीत घडत आहे. पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. कारण माझी लढाई वैयक्तिक नाही, तर पक्षासाठी आहे. परंतु उशाजवळ साप ठेवून कधी झोप लागत नाही. पक्षातीलच काही जण माझ्या विरोधात षडयंत्र रचताहेत. स्वतः निष्ठेच्या गोष्टी सांगायच्या आणि पक्षात राहून पक्षाचीच वाट लावायची ही वृत्ती घातक आहे, अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आगामी काळ हा आपलाच आहे. सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल, असा विरोधकांना घरचाआहेरही दिला. आमदार भास्कर जाधव यांनी 'या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे', असे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आवाहन करत रविवारी शहरातील बांदल हायस्कूल सभागृहात स्नेहमेळावा आयोजित केला होता.
यावेळी राडा प्रकरणात अटक झालेल्या सर्वांचा यथोचित सन्मान देखील आमदार जाधवांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ते बोलत होते. यावेळी जाधव म्हणाले की, २०१९ मध्ये उद्धवजी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्री मंडळात मला संधी मिळायला हवी होती. तो माझा हक्क होता. कारण विधिमंडळात अनुभवी आणि ज्येष्ठ मी होतो, पण संधी मिळाली नाही. पक्ष फुटीनंतर गट नेते निवडताना देखील माझा विचार झाला नाही. पण मी अजिबात नाराज झालो नाही. कारण मी कोणताही स्वार्थ ठेवला नाही. आताही माझा स्वार्थ नाही. परंतु पक्षातून जेव्हा आमदार फुटत होते, त्यावेळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत काही आमदारांचा भाजप बरोबर जाण्याचा आग्रह होता. पण मी एकट्याने थेट विरोध केला. जर तुम्ही भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नसेल, असे मी पक्षप्रमुखांना स्पष्ट बोललो होतो. उद्धवजीनी देखील मला त्यावेळी साथ दिली आणि मी ही त्यांना शब्द दिला.
२०२४ ला पुन्हा आपली सत्ता येत नाही तो पर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. हा शब्द मी उद्धव ठाकरे ना दिला आहे. त्यासाठी मी लढत आहे. लढत राहणार आहे, असे ठामपणे आमदार जाधव म्हणाले. चिपळुणात राडा झाल्यानंतर अमच्यातलेच काही लोक पोलीस स्थानकात फेऱ्या मारत होते. कार्यकर्त्यांच्या नावाची यादी पोलिसांना देत होते. हा आमचा, तो भास्कर जाधवांचा, त्याला बाहेर काढा, याला घ्या ताब्यात, इतकेच नव्हे तर माझ्या सहकाऱ्यांचे पत्ते आणि घरे देखील पोलिसांना दाखवत होते. कोण हे गद्दार. हा माझा विश्वास घात आहे. मला प्रचंड धक्का बसला आहे. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण अद्याप मी बघितलेले नाही. असे म्हणत त्यांनी थेट पक्षांतर्गत विरोधकांचाच जोरदार समाचार घेतला.