रत्नागिरी : येत्या दोन दिवसात आपण पक्षांतर करणार असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत शुक्रवारी दिली. यावेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे भास्कर जाधव यांचा शिवसेना पक्षप्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, भास्कर जाधव यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.भास्कर जाधव यांनी ह्यमातोश्रीह्णवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. ही सदिच्छा भेट होती की पक्षप्रवेशासाठी होती, याची चर्चा सुरू होती. या भेटीची कबुली खुद्द आमदार भास्कर जाधव यांनी दिल्याने अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या होत्या.
तब्बल १५ वर्षांनंतर भास्कर जाधव यांनी ह्यमातोश्रीह्णवर जाऊन पक्षप्रमुखांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये आपण पक्ष का सोडला याची माहिती पक्षप्रमुखांना दिल्याचेही भास्कर जाधव यांनी सांगितले होते. आपल्यातील जळमट आता दूर झाली असून, अजूनही आपण पक्षात प्रवेश करण्याचा विचार केला नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पक्षप्रवेशाबाबत कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले होते.दरम्यान, शुक्रवारी चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गुहागरमधील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत भास्कर जाधव यांनी आपण येत्या दोन दिवसात पक्ष बदलणार असल्याचे सांगितले. मात्र, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीदरम्याने कार्यकर्त्यांनी आपण पक्ष सोडण्याचे नेमके कारण काय? पक्षाकडून आपल्यावर कोणता अन्याय झाला आहे, असे प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारले. मात्र, या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली नाहीत. जे आपल्यासोबत येतील त्यांना बरोबर घेऊन काम करू आणि जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल आपल्या मनात कोणताच राग नसेल असेही जाधव यांनी सांगितले.