चिपळूण : विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करताच त्यांच्यावर विराेधी पक्षाकडून टीका केली जात आहे. अनेकांनी त्यांच्याबाबत राग व्यक्त केला आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था जाहीर केल्यानंतर त्यांच्या चिपळूण येथील कार्यालयाबाहेर आणि निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस आमदार जाधव यांनीच गाजवले. विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी संधी मिळताच त्यांनी विरोधी पक्षाला थेट अंगावर घेतले. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे जाधव यांनी विधानसभेतही आपली आक्रमकता दाखवून दिली. भाजपबरोबर पहिल्याच दिवशी झालेल्या वादात त्यांनी थेट भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले. त्यामुळे भाजप सदस्य अधिक आक्रमक झाले.
दुसऱ्या दिवशीही आमदार जाधव यांनी नियमांवर बोट ठेवत भाजप सदस्यांना खडेबोल सुनावले. तसेच त्यांना नियमांची आठवणही करून दिली. तसेच विधानभवनाबाहेर प्रति विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांसमोरील माइक काढून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. तसेच विधानसभेतही तडाखेबंद भाषण करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे जाधव भाजपच्या रडारवर आले, तर शिवसेना आणि महाविकास आघाडीत त्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान, आपल्याला धमक्या येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनीही विधानसभेत त्याचा पुनरुच्चार केला होता. याची दखल घेत राज्य गृह विभागाने आमदार जाधव यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची घोषणा करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली. मुंबई येथे मंगळवारी रात्रीच त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली, तर चिपळूण येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच त्यांच्या सुवर्ण भास्कर या निवासस्थानीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ स्वतः लक्ष ठेवून आहेत.