रत्नागिरी : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.
प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांनीही एकसंघ राहून शासनाच्या सोयीसुविधा मिळविणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्र अभियंता चालन विजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील रस्ते चांगले राहावेत, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्या संकल्पनेतून शासकीय निधीतून रत्नागिरी बसस्थानक १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. लवकरच लांजा बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन करताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित बसस्थानके उभारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यात येणारे रत्नागिरी बसस्थानक भविष्यात माईल स्टोन ठरणार आहे.
महामंडळाचा कर्मचारी शासकीय कर्मचारी व्हावा, अशीच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. शिल्लक बसस्थानकांनाही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. मुंबई प्रादेशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी बसस्थानकाची रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.