मंडणगड : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणक्षेत्रातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढून दुर्लक्षित व बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी आयुष्यभर झपाटल्यासारखे काम केले. त्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेतून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले. खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात जाऊन विद्यार्थी गोळा करून आणले व त्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य केले, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डाॅ. सुभाष सावंत यांनी दिली.
गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, डॉ. भरतकुमार सोलापुरे, ग्रंथपाल दगडू जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सांस्कृतिक विभागाचे डॉ.अशोक साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कर्मवीर अण्णांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. आभार प्रा. महादेव वाघ यांनी मानले.