चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका परिसरात असणारा जयभीम स्तंभ तोडल्याने आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. नगर परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार हा स्तंभ पुन्हा उभा राहिला. मात्र, ४० वर्षांहून अधिक काळ असणाऱ्या आमच्या झोपड्यांचे काय, असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कांबळे) गटाचे नेते प्रभाकर जाधव, चिपळूण शाखेचे सरचिटणीस सुभाष सावंत, रिपब्लिकन पक्षाचे चिपळूण अध्यक्ष माधव पवार, सरचिटणीस सुभाष सावंत, सुरेश कदम आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्तंभाची माहिती घेतली व वस्तुस्थितीची पाहणी केली. या भागात राहणाऱ्या रहिवाशांजवळ या शिष्टमंडळाने चर्चा केली. गेली अनेक वर्षे आम्ही येथे राहतो. मतदानकार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड आमच्याकडे आहे. मात्र, पिण्यास पाणी नाही, लाईट नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. मतदानामध्ये आम्ही सहभाग घेतो, असे येथील महिला जयमाला चव्हाण, रेणुका मिसाळ, निर्मला नलावडे, जानकी पवार, सखू राठोड, दुर्गा चलवादे, देवकी चलवादे, लक्ष्मी पोळ तसेच सुरेश माळी, राजेश नलावडे, बबलू पोळ, लालू राठोड यांनी सांगितले. माणूस म्हणून आम्ही जगत असताना आम्हाला मूलभूत सुविधा नाहीत. नगर प्रशासनाने कारवाई करुन स्तंभ तोडल्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा स्तंभ बांधून दिला. परंतु, आमच्या मूलभूत गरजांचे काय? हगणदारी मुक्त योजना आली, स्वच्छ भारत अभियान सुरु झाले, डेंग्यु मुक्तीचे अभियान चालू आहे, तरी येथील माणसे मानवताहीन जीवन जगत आहेत. अधिकारी लक्ष देतील काय? असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. गेली अनेक वर्षे आम्ही या झोपडपट्टीत राहात असून, आम्हाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.(वार्ताहर)
भीमस्तंभ उभारला, वस्तीचे काय?
By admin | Published: December 17, 2014 9:40 PM