खेड : बौद्धजन ग्रामस्थ मंडळ यांच्या प्रयत्नातून खेड शहर व ग्रामीण भागातील अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पंधरा कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात आली. आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या मदतीचे वाटप करण्यात आले.
खेड तालुक्यात दि. २१ ते २३ जुलै या कालावधीत अतिवृष्टी होऊन महापूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी तालुक्यात विविध भागातून मदतीचा ओघ सुरु आहे. मुंबईस्थित बौद्धजन ग्रामस्थ मंडळ, भोमडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातून तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगंगा यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुमारे ७५ हजार रुपयांचा मदतनिधी खेडसाठी एकत्र केला होता.
आमदार योगेश कदम, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, बौद्धजन ग्रामस्थ मंडळ, भोमडीचे अध्यक्ष सुशील घाडगे, शाखा अभियंता राहुल घाडगे, अनिल पवार यांच्या उपस्थितीत १५ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आमदार कदम यांनी कौतुक केले.