चिपळूण : गेली दीड वर्षे शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश बाबुराव वायकर (५०, रा.मुदखेडा, जामनेर, जळगांव), अशोक देवराम जोशी (४०, रा.वावडी, जामनेर, जळगांव) अशी पकडलेल्या दोघां भोंदूबाबांची नावे आहेत. भोंदूबाबा गणेश वायकर व त्याचा साथीदार अशोक जोशी हे दोघेजण गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील रश्मी पॅलेस समोरील कुंजवन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते. याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली. या दोघांकडे आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी ३० हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील सांगितले. या प्रकाराने ही महिला अवाक झाली. यानंतर तिने याची माहिती आपल्याला मैत्रिणीला सांगितली. यानुसार दुसरी महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुम्हाला यश येण्यासाठी ५० हजार रुपये लागतील. तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम करून देतो, असे सांगितले. हा प्रकार वेगळाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात आले आणि पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा भोंदूबाबा किचन रूममध्ये त्याच्या सहकाऱ्यासह बियर प्राशन करत होता. बियरच्या बाटल्या तेथेच आढळून आल्या. या प्रकाराबाबत पोलिसांनी खडसावले असता दोघांनीही बियर प्यायल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले आणि वैद्यकीय तपासणी करिता कामथे रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
Ratnagiri: चिपळुणात भोंदूबाबासह दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले
By संदीप बांद्रे | Published: June 25, 2024 7:23 PM