राजापूर : भक्ष्याचा पाठलाग करताना चुकुन विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे मंगळवारी घडली.याबाबत राजापूरच्या वनविभागाने माहिती दिली. या माहितीनुसार कोंड्ये बेंद्रेवाडीतील संतोष शंकर दर्पे यांच्या शेतमळ्यातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचे मंगळवारी सकाळी दर्पे यांच्या लक्षात आले.
सकाळी विहिरीवरील पंप सुरु केल्यानंतर पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी दर्पे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आत त्यांना बिबट्या दिसला. दरम्यान संतोष दर्पे यांनी आजुबाजुला ही माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबत कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. सुमारे एक वर्षे वयाचा तो बिबट्या मादी असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी चिपळूण वन अधिकारी रमाकांत भवर, वनक्षेत्रपाल प्रियंका लगड, राजापूरचे वनपाल एस्. व्ही. घाटगे, वनपाल संजय रणधीर, कर्मचारी दीपक म्हादे, विजय म्हादे, दीपक चव्हाण उपस्थित होते.