रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहे.
ऑक्टोबर हीट आणि दिवाळीपूर्वी थंडी सुरू झाल्याने आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेने बागायतदार सुखावले हाेते. गेल्या दहा वर्षांत उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यात आलेला मोहर काळा पडून खराब झाला. मोहर कुजल्याने सुरुवातीचे १५ ते २० टक्के येणारे पीक वाया गेले. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती सध्या आहे. नोव्हेंबर संपत आला तरी थंडी गायब असून, उकाडा वाढला आहे. शिवाय अधूनमधून पाऊस पडत असून, ढगाळ वातावरण राहत आहे. ढगाळ हवामानामुळे मोहरावर तुडतुडा, उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
हवामानातील बदलाचा अंदाज घेत कीटकनाशक फवारणी करावी लागते. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहर वाचविण्यासाठी २५ ते ३० टक्के खर्च केला आहे. महागडी, चांगल्या दर्जाची कीटकनाशके फवारली असली तरी दमट हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे. यापुढे पाऊस झाला नाही तर पीक उशिरा का होईना येईल. मात्र, थंडी पडण्याची आवश्यकता आहे. थंडीमुळे गतवर्षी ज्या झाडांना फळधारणा झालेली नाही व सध्या पालवी न येता कडक पाला आहे त्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.
हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा उत्पादनही खालावले आहे, शिवाय पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. कीटकनाशकांच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, यांत्रिक अवजारांसाठीही इंधन वापरावे लागत असल्याने एकूण खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर उपलब्ध होत नाही. याबाबत योग्य उपाययोजना शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी