दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम गुरुवारी (दि. १२) दापोली दिवाणी न्यायालयात हजर झाले. न्यायालयानेअनिल परब यांना दिलासा देत प्रत्येकी १५ हजारांचा जामीन मंजूर केला आहे.मुरूड समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड, ना-विकास क्षेत्र (एनडीझेड) नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. त्यानंतर केंद्र सरकारने दापोली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनंतर अनिल परब यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले हाेते. अनिल परब यांनी गुरुवारी पहिल्यांदाच दापोली दिवाणी न्यायालयात हजेरी लावली. तसेच दापोली पोलिस स्थानकात जाऊन जबाबही नोंदवला आहे.दिवाणी न्यायालयात याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.
आपली न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. आपल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस स्थानकात वेगवेगळ्या प्रकारच्या सहा केसेस दाखल आहेत. तसेच वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी यापूर्वी तपासही केला आहे. आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व प्रकरणातून निर्दोष सुटू, असा विश्वास आहे. - अनिल परब, माजी परिवहन मंत्री.