रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील कार्यालयाने गुरूवारी (दि. १९) रत्नागिरी आणि परिसरातून बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यात ४० स्वारांनी सहभाग घेतला. जनसामान्यांमध्ये तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.भारतीय तटरक्षक दल १ फेब्रुवारी २०२४ रोजी आपला ४८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेली ही बाईक रॅली तटरक्षक दलाच्या प्रांगणापासुन सकाळी ८ वाजता सुरू झाली. वेतोशी येथील शिवार अॅग्रो टुरिजम ते आरे वारे मार्गे रत्नागिरी असा ४४ किलोमीटर अंतराच्या निर्धारित मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.या रॅलीला तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिर्देशक शत्रूजीत सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. तटरक्षक दलाच्या जवानांबरोबरच रत्नागिरी शहरातील हॉर्समेन या मोटर बाईकिंग ग्रुपच्या सदस्यांनी देखील या रॅलीमध्ये समावेश घेतला. या ग्रुपचे मिलिंद पाटकर, अंकिता पाटकर, फतीन वस्ता, मयूरेश यादव व स्वप्नील रसाळ यांच्यासह सुमारे ४० बाईक राईडर्सनी या रॅलीत सहभाग घेतला.वेतोशी येथील शिवार अॅग्रो टुरिजम येथे या रॅलीत सहभागी सदस्यांना तटरक्षक दलाचे कार्य आणि त्यात भरती होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तेथे शिवार अॅग्रो टुरिजमचे प्रवर्तक अशोक साळुंखे व पराग साळुंखे यांनी त्यांच्या या प्रकल्पाची आणि तेथील सोयी सुविधांची माहिती रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना दिली. त्यानंतर आरे वारे मार्गे रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या प्रांगणात परत येऊन या बाईक रॅलीची ११ वाजता सांगता झाली.रॅलीला मार्गक्रमण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे सहकार्य लाभले. या रॅलीचा उद्देश जनसामान्यांमध्ये तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, बाईक पर्यटनाबद्दल प्रेरणा देणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.
तटरक्षक दलाच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीत बाईक रॅली, कार्याबाबत केली जनजागृती
By शोभना कांबळे | Published: January 20, 2024 5:08 PM