चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे पहिले आमदार सूर्यकांत उर्फ बापूसाहेब खेडेकर (७०) यांचे मार्कंडी येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री ९.३० वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय निष्ठावंत शिवसैनिक होते.चिपळूण शहरातील डीबीजे कॉलेजच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, शिवसेनेचे माजी आमदार, अर्बन बँकेचे माजी चेअरमन, वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष, वैश्यवाणी पतसंस्थेचे विद्यमान संचालक अशा विविध संस्थांवर विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले होते.
चिपळुणात शिवसेना स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. व्यापारी ते शिवसेना आमदार असा आशादायक प्रवास त्यांनी केला. काँग्रेस ऐन भरात असताना रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय राजधानी चिपळूण येथे काँग्रेसचे मजबूत वर्चस्व असताना १९९० साली शिवसेनेकडून बापूसाहेब खेडेकर यांचा अगदी कमी मताने विजयी झाले होते आणि तेथूनच शिवसेनेची सुरु झालेली घोडदौड आजपर्यंत चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात दिमाखात सुरु आहे.
१९९० ते १९९५ साली शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून त्यांनी निवडून येण्याचा मान मिळविला आहे.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात ते अग्रेसर होते. शहरातील पवन तलाव मैदानावर काही वर्षापूर्वी राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा होत होती. या स्पर्धेची सुरुवात बापूसाहेब खेडेकर यांनी केली. त्यामुळे चिपळूणच्या क्रीडा रसिकांना त्यावेळचे भारतीय संघातील नामांकित खेळाडूंचा खेळ पाहायला मिळत होता. ते मनमिळावू स्वभावाचे होते.
चिपळूण तालुक्यात वाडीवस्तीवर शिवसेना हा पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या निवासस्थानी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध स्तरातील नागरिकांची अंत्यदर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती. त्यांच्या पार्थिवावर रात्री ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. या शाखेच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यावेळी बापूसाहेब खेडेकर यांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते.