रत्नागिरी : ठाण्याच्या शहापूरमधील एका कुक्कुट पालन केंद्रातील ३०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या, सध्या प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून, हे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त हाेईल, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदाररत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना दिली.
हा भाग सील करण्यात आला आहे. दक्षता म्हणून तेथून पसरणार नाही यासाठी उपाययाेजना करण्यात येत आहे. नुकसानाबाबत धाेरणानुसार शासन मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.रत्नागिरीत आज (शुक्रवार) काॅंग्रेस ओबीसी सेलतर्फे भाजप सरकारविराेधात माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चासाठी मंत्री सुनील केदार रत्नागिरीत आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे - शहापूर येथील बर्ड फ्ल्यूबाबत पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले की, जे नुकसान झाले आहे त्याला मदतीची भूमिका शासनाची हाेती. आजही आहे. काही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. अचानक हा विषाणू कसा आला याचीही वैज्ञानिकदृष्ट्या चाैकशी करु. कायमस्वरुपी कसे थांबवता येईल, कशी काळजी घ्यावी लागेल याबाबतही विचार केला जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उद्याेग आहे.अलीकडच्या काळात तरुण स्वयंराेजगार म्हणून हा उद्याेग करत आहेत. याला सांभाळण्याची भूमिका व कर्तव्य शासनाची आहे. शासन त्यात नक्की लक्ष घालेल आणि यापुढे असे हाेणार नाही, याची काळजी घेऊ, असेही मंत्री केदार यांनी सांगितले.त्या भागातील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय झाला आहे का, यावर बाेलताना मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, त्या पूर्वीपासूनच मार्गदर्शक तत्वे पहिल्यापासूनच आहे. ज्याठिकाणी हा संसर्ग हाेताे, ताे इतर भागात पसरू नये याची काळजी घेतली जाते.या राेगाची व्याप्ती अधिक असते. हा राेग पसरला तर पक्षी २४ तासही राहत नाही. पाेल्ट्रीमध्ये हजाराे पक्षी असतात तेवढे नुकसान राज्य आणि उद्याेजकाला परवडणारे नाही, त्यामुळे त्याठिकाणी काळजी घेण्यात आली आहे, असेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.