चिपळूण : आपल्या कुटुंबियांशी, जन्मभूमीशी व कर्मभूमीशी असलेले नातेसंबंध सोडून चिपळुणातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व सुवर्ण मंदिरचे मालक विजय जवानमल ओसवाल यांची कन्या आरती सचिन ओसवाल या १ फेब्रुवारी २०२० रोजी सहकुटुंब सन्यासाश्रम स्वीकारणार आहेत. यानिमित्त मंगळवारी या कुटुंबियांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.सुरत येथील दीक्षाविधी महोत्सवात प्रसिद्ध प्रवचनकार प. पू. विजय श्रेयांस प्रभू सुरीश्वरजी महाराज यांच्या निश्राखाली हे ओसवाल कुटुंबिय दीक्षा घेणार आहेत. आरती ओसवाल यांच्यासह पती सचिन लीलाचंद ओसवाल, मुलगी कृपा सचिन ओसवाल, विरती सचिन ओसवाल व राजूल दीपस ओसवाल हे पाचजण दीक्षा घेत आहेत. सर्व घरादाराचा, नात्यागोत्यांचा व धनदौलतीचा त्याग करून सन्यासाश्रम स्वीकारण्याचा कठोर व धाडशी निर्णय ओसवाल कुटुंबियांनी घेतला आहे.संसारात राहून सन्यस्थ जीवन जगणाऱ्या प्रतिमाधारी आजी तिजाबाई जवानमल ओसवाल यांचे धार्मिक संस्कार बालपणीच आरती ओसवाल यांच्या मनावर कोरले गेले होते. म्हणूनच आरती यांनी या रत्नत्रयाचा अवलंब करून शुद्ध आचरणाने शुभ भावाने संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे.
या कुटुंबियांची शहरातील मार्कंडी येथील जैन मंदिर ते भोगाळे जैन मंदिर अशी वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर पुणे येथे ४ ते ८ जानेवारी या कालावधीत बिदाईपर्यंत कार्यक्रम होणार आहे.