रत्नागिरी : मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.रत्नागिरीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. भाजप संघटनेचे काम आणि निवडणूक याची सांगड घालत प्रत्येक तालुक्याने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी, असे पटवर्धन म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाला अपेक्षित काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले.युती झाल्यास भाजपला पाच मतदार संघातील किमान २ मतदार संघ मिळावेत, अशी आग्रही मागणी यावेळी तालुकाध्यक्षांनी केली. सद्यस्थितीत जिल्हा कार्यकारिणी अगर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने संघटनेसंदर्भात द्यावयाचे निर्देश जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड.़ पटवर्धन हे व्यक्तिगतरित्या सर्व तालुकाध्यक्षांना देणार आहेत.सर्व तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या बैठकीला संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, लांजा तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे, गुहागरचे सरचिटणीस नीलेश सुर्वे, चिपळूणच्या मनिषा निमकर, राजापूरचे अभिजीत गुरव, खेडचे विनोद चाळके, रत्नागिरीचे प्रशांत डिंगणकर उपस्थित होते.पाचही युतीचे उमेदवार विजयी होतीलभाजप व शिवसेना यांची युती झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात भाजप संघटना युतीच्या उमेदवारांसाठी काम करेल आणि भाजपप्रणित सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी रत्नागिरीतून पाचही युतीचे आमदार विजयी होतील, असा प्रयत्न करण्याचे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी पदाधिकाऱ्यांना केले.