राजापूर : राजापूर नगर परिषदेने रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ मंजूर केलेल्या ठरावाला शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेकडून कारवाईचे संकेत देण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपने ठरावाच्या भूमिकेचे स्वागत करतानाच, रिफायनरीला पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेने केलेल्या कारवाईचा खरपूस समाचार घेतला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी याबाबत शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व पक्षनेतृत्व यांनी चालवलेल्या भोंगळ आणि बोगस कारभाराचे प्रत्यंतर सर्व जनतेला आलेले आहे. त्या दोन नगरसेविकांनी जनतेचे प्रांजळ मत स्पष्टपणे स्वीकारल्यामुळे राजापूर भाजपच्यावतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.
जनतेचे मत व जनतेचे हित स्वीकारण्याचे धैर्य या दोन्ही नगरसेविकांनी दाखविले. मात्र तसे धैर्य शिवसेनेचे आमदार, खासदार व नेतृत्वाकडे नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनाच जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे नेतृत्व जनतेसमोर उघडे पडले आहे. जनतेच्या हिताचा विचार करून त्या दोन्ही नगरसेविकांनी या ठरावाला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार, खासदार व त्यांच्या नेत्यांची आगपाखड झाली आहे आणि ते कारवाईची भाषा करू लागले आहेत, असा टाेलाही गुरव यांनी हाणला आहे.