लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे थांबलेली भाजपची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवार २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. मंत्री नारायण राणे यांच्याच नेतृत्त्वाखाली ही यात्रा सिंधुदुर्गकडे जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देऊन लोकांकडून आशीर्वाद घेण्यासाठी सुरू झालेली जनआशीर्वाद यात्र सोमवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली. मात्र मंगळवारी दुपारी मंत्री नारायण राणे यांना गोळवली (ता. संगमेश्वर) येथे पोलिसांनी ताब्यात झाल्यानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. हा सर्व प्रकार यात्रा अडवण्यासाठीच आहे की काय, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाजपकडून आणि स्वत: मंत्री नारायण राणे यांनीही ही यात्रा पुन्हा सुरू होईल, असे जाहीर केले आणि शुक्रवारी रत्नागिरीपासून ही यात्रा पुन्हा सुरू होत आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग व काजू उत्पादकांशी चर्चा, भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विविध शिष्टमंडळांशी चर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. दुपानंतर ते लांजा, राजापूर येथे कार्यकर्त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत.
जय्यत तयारी
जनआशीर्वाद यात्रेत आलेली बाधा दूर झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा यात्रेत सहभागी होत असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा जोश अधिकच वाढला आहे. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीनही ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यामुळे विविध क्षेत्रांमधील शिष्टमंडळांना थेट राणे यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे, असे भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.