रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केल्यामुळे युतीमधील जिल्ह्यातील जागा वाटपाचा विषय अजूनच गुंतागुंतीचा होणार आहे. तीन मतदार संघात मुळातच शिवसेनेचे आमदार आहेत.
भाजपसाठी शिल्लक राहिलेला एकमेव गुहागर मतदारसंघही आता विद्यमान आमदार म्हणून सेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याने भाजपला जिल्ह्यात उमेदवारीसाठी विधानसभा मतदारसंघच शिल्लक राहणार नाही.येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होईलच, असे राज्यस्तरावरील नेते ठामपणे सांगत आहेत. युती झाली तर युतीतील भाजपला रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघच उरणार नाही, असे चित्र आता दिसू लागले आहे.
जिल्ह्यात सध्या राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपात हे तीनही मतदार संघ त्यांच्याकडेच राहतील, हे निश्चित आहे. उर्वरित दापोली आणि गुहागर या दोन मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.सन २०१४च्या निवडणुकीत युती झाली नव्हती. तेव्हा दापोलीमध्ये शिवसेना आणि गुहागरमध्ये भाजपकडे दुसऱ्या क्रमांकाची मते होती. जागा वाटपाच्या पद्धतीनुसार दुसऱ्या क्रमांकाची मते असलेल्या पक्षाला तेथील उमेदवारी दिली जाते. मात्र, आता गुहागर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर गुहागरमधून लढण्याची इच्छाही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी देण्याचा निकष लावला गेला तर गुहागर मतदार संघ भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.दापोली मतदारसंघात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपले सुपुत्र योगेश कदम यांच्यासाठी गेली तीन वर्षे जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यादृष्टीने त्यांचा प्रचारही सुरू आहे. त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ सोडणार नाही, हेही निश्चित आहे.
भाजपने गुहागर मतदार संघासाठी ठाम मागणी केली असली तरी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला तेथील उमेदवारी देण्याची प्रथा असल्याने गुहागर मतदारसंघ सेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी राज्यातील अन्य एखादा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मतदार संघच शिल्लक राहणार नाही.
ही शक्यता लक्षात घेऊन भाजपचे गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी लगेचच सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या मतदार संघाची मागणी केली आहे. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये या जागेवरून वितुष्ट येण्याची शक्यता आहे.सेनेमागून फरपटजिल्हा परिषद, नगर परिषदा अशा ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेशी युती आहे, अशा सर्वच ठिकाणी भाजपला दुय्यम वागणूक देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला सत्तेत भागिदार करण्याची शिवसेनेची इच्छा नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागून फरपटत जात आहे. विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे, अशी प्रतिक्रिया एका भाजप पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.कार्यकर्ते स्वीकारतील?गुहागरची जागा शिवसेनेला दिली गेली तर भाजप कार्यकर्ते हा निर्णय स्वीकारतील का, हा मुख्य प्रश्न आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी या जागेसाठी दावाकेला आहे. जागा वाटप करताना या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलून ही जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेणे धोक्याचे ठरणार आहे.