रत्नागिरी : मोदी या आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात रत्नागिरीत भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल ॲड. पटवर्धन यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहुल गांधी यांनी ''मोदी'' या आडनावावरून अपमानास्पद टीका करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे.
न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ॲड. पटवर्धन म्हणाले.यावेळी मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, चंद्रशेखर पटवर्धन, राजू भाटलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचा सहभागही मोठा होता.