रत्नागिरी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने रत्नागिरी भाजपतर्फे शनिवारी शहरातील विविध भागात निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरी शहरात साळवी स्टॉप ,मारुती मंदिरजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, शासकीय रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक, जयस्तंभ, गाडीतळ येथे ही निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. इतर मागासवर्गाचे आरक्षण हा घटनादत्त अधिकार आहे. त्यापासून ओबीसी समाजाला वंचित करण्यामागे राज्य शासनाचा कुटील हेतू आहे. राजकीय प्रवाहातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व कमी करून राजकीय निर्णयातील व शासनस्तरावरील निर्णय प्रक्रियेतून ओबीसी समाजाचे प्रतिनिधी दूर राहावेत, या हेतूने शासनाने न्यायालयात योग्य पद्धतीची माहिती सादर केली नाही, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
कोविडचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन चक्का जाम आंदोलन करणे आम्ही जाणीवपूर्वक टाळले आहे. मात्र, नजीकच्या कालावधीत ओबीसींना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन उभे करणे भाग पडेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी तहसीलदार (सर्वसाधारण) दत्ताराम कोकरे यांना याविषयीचे निवेदन दिले.