लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने चिपळूण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शहरातील बहादूरशेख नाक्यावर कार्यक्रम सुरू असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत व प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल मारत निषेध व्यक्त केला. याचवेळी खासदार नीलेश राणे कार्यकर्त्यांसमवेत शिवसैनिकांसमोर उभे ठाकले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सकल मराठा समाजातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळीही घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने रायगड दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याने येथील शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे सोमवारी रात्री येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर वालोपे येथील हॉटेल रिम्झ येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी १० वाजता ते शहरातील बहादूरशेखनाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आले. या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. याचवेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व अन्य पूर परिस्थितीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाबाहेर शिवसैनिक दाखल झाले व जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी काही राणे समर्थक कार्यकर्ते आम्हीही वाट्टेल ते ऐकून घेणार नाही, असे बोलून त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी जोरदारपणे सुरू होती. त्यानंतर काही वेळातच नारायण राणे हे पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले आणि त्याचवेळी राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा आणून निषेध करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तो पुतळा जप्त केला.
या वेळी वातावरण काहीसे निवळले असल्याचे वाटत असतानाच शिवसैनिक पुन्हा हॉटेल अतिथीसमोर दाखल झाले. या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे राणे यांचा सत्कार करण्यात आला. राणे यांचे भाषण सुरू असतानाच येथेही शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुंबई - गोवा महामार्गावर पुन्हा एकदा कार्यकर्ते आमने-सामने आले. या वेळी शिवसेनेने राणे यांना अटक झालीच पाहिजे, अन्यथा चिपळूण सोडू देणार नाही, अशी मागणी केली. या वेळी काही महिला शिवसैनिकांनी बांगड्या दाखवून निषेध व्यक्त केला. पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही परिस्थिती कुशलतेने हाताळली. त्यानंतर नारायण राणे रत्नागिरीकडे रवाना झाले.
--------------------------
पोलीस स्थानकात तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम व शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिक पोलीस स्थानकात धडकले. तसेच महामार्गाने निषेध रॅलीही काढण्यात आली.
-----------------------
काही तास महामार्ग ठप्प
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने आयोजित कार्यक्रम मुंबई-गोवा महामार्गालगत होते. त्यातच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकली होती.