राजापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा राजापुरातील शिवसैनिकांकडून एस. टी. आगारासमाेरील भाजप कार्यालयासमाेर राणे यांच्या फोटोचे दहन करीत निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी दाखल झाल्याने दाेन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांशी भिडले. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरण निवळल्याने पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे केलेल्या चुकीच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून राज्यभर आंदाेलने करण्यात आली. राजापूर आगारासमोरील भाजप कार्यालयापुढेच संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या फोटोचे दहन केले. त्यावेळी समोरच कार्यालयात बसलेले भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले व त्यांनी यास हरकत घेतली. तसेच शिवसैनिकांच्या हातातील राणेंचा फोटो खेचून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली व त्यातूनच धक्काबुक्की करण्यात आली. एकमेकांना ढकलण्यात आल्याने काहींना फटकेही बसले.
दरम्यान, या प्रकाराची माहिती राजापूर पाेलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन हस्तक्षेप केला. तसेच पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दूर हटविले. त्यामुळे काेणताही अनुचित प्रकार घडला नाही. आमचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल किंवा शिवसेनेबद्दल कुणी अपशब्द वापरला तर ती बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राजापुरातील शिवसैनिकांनी यावेळी दिला.