मनाेज मुळ्येरत्नागिरी : केंद्रात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अधिकाधिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. युती असताना आतापर्यंत शिवसेनेकडे असलेल्या रत्नागिरीलोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघात दौरा करून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे आणि दोन महिन्यांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही या मतदार संघात येणार आहेत.२०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजपची युती होती. विधानसभा निवडणुकीनंतर ही युती तुटली. आता भाजपसोबत असलेली शिवसेना विभागलेली आहे. त्यामुळे जे मतदारसंघ आधीच्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत, अशा मतदारसंघांकडे भाजपने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यात रत्नागिरीचा समावेश आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून रत्नागिरी लाेकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. आताच्या घडीला रत्नागिरीतील तीनपैकी एक मतदारसंघ शिवसेनेकडे, एक राष्ट्रवादीकडे आणि एक उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनपैकी एक मतदारसंघ भाजपकडे, एक शिवसेनेकडे आणि एक उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहे. नारायण राणे यांच्या रूपाने एक केंद्रीय मंत्रिपद भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आहे. दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचे एकेक आमदार असून, दोघांकडेही मंत्रिपद आहे.भाजपवर सर्वाधिक राग असल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेकडून या निवडणुकीत ताकद पणाला लावली जाईल, हे निश्चित आहे. दोन जिल्ह्यांत मिळून दोन मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे आमदार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी असेल, असे चित्र आता तरी दिसत आहे. त्यादृष्टीने एक जागा राष्ट्रवादीकडे आहे. सद्य:स्थितीत सहापैकी तीन मतदारसंघ भाजप शिवसेना युतीकडे आणि तीन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद समान आहे.उमेदवार निश्चित नाहीउद्धव ठाकरे शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुढील उमेदवार असतील, असे चित्र आहे. त्यात बदल होण्याची शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला ही जागा भाजप लढणार की शिवसेना लढणार, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण असेल, याबाबतही काही निश्चिती नाही. अनेक नावांबाबत केवळ चर्चाच आहेत. निवडणुकीला आता सव्वा वर्ष उरले असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांकडून उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पुढे आलेले नाही.केंद्रीय मंत्र्यांचे दौरेकेंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी नुकताच लोकसभा मतदार संघात दौरा केला. हा त्यांचा दुसरा दौरा. अजून तीन महिन्यांनी ते पुन्हा दौरा करुन केंद्राच्या योजनांचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हेही दोन महिन्यात कोकणाचा दौरा करणार आहेत. ही २०२४ साठी भाजपची तयारी आहे.८५० बूथ कार्यरतउमेदवार कोणीही असो, भाजपचा असो किंवा मित्र पक्षाचा असो, आमची तयारी पूर्ण झाली आहे. या लोकसभा मतदार संघातील साडेआठशे बूथ कमिट्या स्थापन झाल्या आहेत आणि त्यांना कामही वाटून देण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे रत्नागिरीचे प्रभारी प्रमोद जठार यांनी नुकतीच दिली.
भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार
By मनोज मुळ्ये | Published: March 01, 2023 1:14 PM