प्रकाश वराडकर रत्नागिरी : जिल्ह्यात युती व आघाडी या दोन्हींमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून बंडाळी माजली आहे. दापोली, गुहागर, चिपळूण व राजापूर या मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून बंड केले आहे.
दापोली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कॉँग्रेसच्या दापोली व मंडणगड तालुकाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करून दंड थोपटले आहेत. महायुतीने बंडखोरांना कारवाईची भीती दाखवली आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत कितीजण माघार घेणार व कोण भूमिगत होणार, याची चर्चा रंगली आहे.राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबरला निवडणूक मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आता अवघे काही दिवस निवडणुकीला उरलेले असताना सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रचाराचे काम करणे म्हणजे रात्र थोडी सोंगे फार, या उक्तीप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. २०१४च्या निवडणुकीत युती तुटली होती. २०१९मध्ये सेना - भाजप युतीमध्ये उमेदवारीवरून असंतोष खदखदत असल्याने बंडखोरी झाली आहे. राज्यात बंडखोरांचा पक्षच स्थापन झाला आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी व राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात युती म्हणून सर्वच जागांवर शिवसेनेला उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील एकही मतदारसंघ भाजपच्या वाटणीला आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खदखद आहे, असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यातील ४ मतदारसंघात सेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे.दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम हे युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तेथून भाजपचे पदाधिकारी केदार साठे यांनी बंडखोरी केली आहे. गुहागर मतदारसंघात भाजपचे रामदास राणे यांनी युतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. चिपळूण मतदारसंघात युतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांच्याविरोधात बंडखोरी करीत भाजपचे तुषार खेतल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राजापूर मतदारसंघात युतीचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात भाजपचे संतोष गांगण यांनी बंडखोरी केली आहे.दापोली मतदारसंघात कॉँग्रेस आघाडीतही बंडाळी माजली आहे. राष्ट्रवादीचे संजय कदम हे आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना त्यांच्या विरोधात कॉँग्रेसचे दापोली तालुका अध्यक्ष भाऊ मोहिते व मंडणगडचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी बंड करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघात सेनेतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सहदेव बेटकर यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापतीपदाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.
गुहागरचे आमदार म्हणून कार्यरत असलेले भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सेनेत प्रवेश केला होता. जाधव यांना सेनेची गुहागरची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे विनय नातू व त्यांचे समर्थक यामुळे नाराज आहेत.दबाव येणारया मतदारसंघात सेनेचे योगेश रामदास कदम यांच्याविरोधात बविआने त्याच नावाचे योगेश दीपक कदम यांना उमेदवारी दिली आहे, तर या खेळीला उत्तर म्हणून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्या विरोधातही नाम साधर्म्य असलेले अपक्ष संजय कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नाम साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती रिंगणात उतरविण्यात कोणाचा हात आहे, याची चर्चा आता सुरू आहे.बंडखोर होणार नॉट रिचेबलउमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युती व आघाडीतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांची नाराजी शमविण्यात युती, आघाडीला यश येणार की माघार घेण्यासाठी दबाव येण्याच्या भीतीने बंडखोर नॉट रिचेबल होणार, याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ७ ऑक्टोबर या अखेरच्या दिवशीच बंडखोरीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.