रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत सत्तेवर असूनही शिवसेनेच्या विकासकामांची धावसंख्या शून्य आहे. भाजपने मंजूर केलेल्या कामांचे नारळ शिवसेना अजून किती काळ फोडणार, असा हल्लाबोल भाजप नगरसेवकांनी केला आहे. नगराध्यक्षांविरोधात भाजप करीत असलेल्या या राजकीय ‘घेराबंदी’ला सेनेतील असंतुष्टाच्या हातभारामुळे अधिकच बळकटी आल्याची चर्चा आहे. नगर परिषदेतील राजकारण वेगळ्या वळणावर असून, एकहाती सत्तेचे काय होणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेत सत्ताधारी शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यातच आता विकासाच्या विविध मुद्द्यांवरून सेनेच्या कारभाºयांना घेरण्याचे तंत्र भारतीय जनता पक्षाने अवलंबले आहे. शून्य विकास, भाजपने मंजूर केलेली ५३ कोटींची नळपाणी योजना राबविण्यात सेनेकडून होणारा विलंब, मोकाट जनावरांची फसलेली मोहीम, कचºयाची समस्या सोडविण्यातील अपयश, दोनदा उद्घाटन झालेल्या विकासकामांचे पुन्हा नारळ फोडणे, विरोधी पक्ष नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना निधी नाकारणे, मोकाट श्वानांची समस्या व निर्बिजीकरण यांसारख्या मुद्द्यांवरून सध्या भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना भाजपसह अन्य विरोधकांनीही लक्ष्य केले आहे.
भाजप नगरसेवकांनी केलेल्या या राजकीय घेराबंदीला नगर परिषदेत सत्तेवर असलेल्या काही असंतुष्टांच्या शुभेच्छा आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेस व अपक्षांकडूनही सत्ताधारी सेनेला अडचणीत आणण्याच्या डावपेचांना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘सेनेतील असंतुष्टांसह मिळून सारेजण’ नगर परिषदेत काही राजकीय चमत्कार घडविणार की काय, याचीही चर्चा होत आहे. नगर परिषदेतील पक्षीय संख्याबळाचा हिशेब मांडला जात आहे.विरोधी नगरसेवकांची संख्या व त्यांनी केलेल्या नगराध्यक्षांच्या घेराबंदीला शुभेच्छा देणाºया सेनेतील असंतुष्टांची बेरीज किती, त्यातून काय होऊ शकते, यांसारख्या प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेत एकूण ३० नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १७, भाजप ६, राष्टÑवादी कॉँग्रेस ५, अपक्ष २ असे संख्याबळ आहे.