रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज २५ हजार पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. परंतु मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत. तुडतुडयाच्या विष्टेमुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. तयार आंबा बाजारात पाठविताना काळे डाग असलेले फळ नाकारले जाते किंवा त्याला अत्यल्प दर दिला जातो.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.
थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशाप्रकारची फवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली तर आंब्यामध्ये कीटकनाशकांचे रेसीड्यू उतरण्याची शक्यता आहे. शिवाय रेसीड्यू फ्री कीटकनाशकांचा वापर केला तर त्याचा प्रभाव राहणार नाही. यामुळे नेमके काय करावे, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करून थ्रीप्स व तुडतुड्यासाठी कीटकनाशक निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या ज्या झाडांवरील फळे काढणी योग्य आहे, तेथे फवारणी करण्याचे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे वाळलेला मोहोर झाडून काळा आंबा पुसून बाजारात पाठवित आहेत. व्यापाऱ्यांनी देखील काळा डाग असलेल्या आंब्याचे दर पाडू नयेत. यावर्षी एकूणच पिक उत्पादन कमी असल्याने याबाबत काळजी घ्यावी.- राजन कदम, बागायतदार, शीळ-मजगाव.