रत्नागिरी : कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला असल्याने यावर्षीच्या हंगामात प्रथमच ‘जीआय’ टॅग असलेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी भौगोलिक निर्देशांकाचा टॅग वापरणे आवश्यक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार बागायतदार असून, आतापर्यंत १५५ बागायतदारांनीच भौगोलिक निर्देशाकांसाठी नोंदणी केली आहे.
कोकणातील पाच जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या हापूसला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. हापूसचा टॅग वापरण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांनादेखील भौगोलिक निर्देशांकासाठी शुल्क भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता ‘हापूस’ नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. सध्या ‘जीआय’ मानांकनाकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, शेतकऱ्यांची संख्या वाढल्यास कारवाई होऊ शकते. सध्या ‘जीआय’चा टॅग नसलेलाच आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. बहुतांश शेतकºयांनी नोंदणी न केल्यामुळे त्याचा गैरफायदा परराज्यातील आंबा बागायतदार घेऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५० हजार आंबा बागायतदार आहेत. बागायतदारांची संख्या मोठी असताना जीआय मानांकनासाठी केवळ १५५ बागायदारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी १२५, तर सिंधुदुर्गमधील ३० जणांचा समावेश आहे. ज्यांना ‘हापूस’ या नावाने आंबा विक्री करायची असेल त्यांनी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारासह २६०० रूपये शुल्क भरणे आवश्यक आहे. यामध्ये २००० संस्थेचे शुल्क, तर ५०० केंद्र सरकारचे शुल्क आहे. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
‘जीआय मानांकनासाठी’ शुल्क भरून नोंदणी झाल्यानंतर भौगोलिक निर्देशांक म्हणून ‘हापूस’ किंवा ‘अल्फान्सो’ नावाचा वापर करता येणार आहे. नोंदणीकृत व्यक्तिंना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फळांसोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यावर कोणत्याही मोबाईलमध्ये फळांचे उत्पादक किंवा प्रक्रियेविषयीची माहिती उपलब्ध होणार आहे. मात्र, ‘हापूस’च्या नावाचा बेकायदेशीररित्या वापर करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई होऊ शकते. दिवाणी, फौजदारी किंवा ग्राहक न्यायालयात त्यावर कारवाई होऊ शकते. हापूसचा टॅग वापरण्यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघ यांच्यापैकी कोणाकडेही नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘जीआय मानांकना’बाबत शेतकरी अद्याप अनभिज्ञ आहेत. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघातर्फे रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या हंगामानंतर दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांशी संपर्क साधून ‘जीआय’ मानांकनासाठी नोंदणी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसेल.
- डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष,
कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था