चिपळूण : रामपूर- देवखेरकी- नारदखेरकी रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह भाजपने रामपूर एसटी बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला. रास्ता रोको आंदोलनामुळे गुहागर मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.रामपूर एसटी बसथांबा ते देवखेरकी, नारदखेरकी पर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेकडून रस्ता १२ किलोमीटर अंतरावर दगड माती टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र आता पावसाळा सुरु झाल्याने रस्ता संपूर्ण चिखलमय बनला होता. त्यामुळे या मार्गावर अनेक वाहनांचे अपघात झाले. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला. याविषयी गंभीरपणे दखल घेत भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थांनी अचानक सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे गुहागर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.कोणत्याही स्थितीत रस्त्यावर ग्रीट व मोठी खडी टाकून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने, कंत्राटदाराने तयार करण्याची मागणी केली. या मागणीसाठी रामपूर - नारदखरकी येथील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनाला बसले. याबाबती माहिती पोलिसांना मिळताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. माने, कंत्राटदार चिपळूणकर हे घटनास्थळी येईपर्यंत आंदोलनकर्ते एका बाजूला थांबले. सार्वजनिक बांधकामचे अभियंता एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देवखेरकी रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांनी नारदखरकी पर्यंत चालत जाऊन रस्त्याची पाहणी करण्यास सांगितले. चार महिने पावसाळ्यात ३ ते ४ गावांनी दळणवळण कसे करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच या रस्त्याची तातडीने डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यावेळी भाजपच्या उत्तर जिल्हा रत्नागिरी महिला सरचिटणीस निलम गोंधळी, तालुकाध्यक्ष अजित थरवळ, डॉ. विनया नातू, अशोक भडवळकर, देवखेरकी सरपंच नम्रता मोहिते, उपसरपंच गणेश हळदे, सदस्या सुरेखा हळदे, सुधीर हळदे, सौरभ चव्हाण, मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, आदित्य आवटे, आवटेवाडी अध्यक्ष अजय आवटे, डॉ. मनोज रावराणे, गणेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ratnagiri: रस्त्याचे निकृष्ट काम; गुहागर-विजापूर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प
By संदीप बांद्रे | Published: June 10, 2024 3:56 PM