दापोली : सह्याद्री प्रतिष्ठान, दापोली तालुका आंजर्ले विभाग व शिवतेज मित्रमंडळ, केळशी यांच्या संयुक्त विद्यमाने केळशी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जनकल्याण रक्त केंद्र, महाड या रक्तपेढीचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात ५९ दात्यांनी रक्तदान केले.
विज्ञान शिबिर
रत्नागिरी : ज्ञानप्रबोधिनीतर्फे आठवी ते अकरावीतील मुला - मुलींसाठी दि. ६ ते १३ जून या कालावधीत विज्ञान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जूनमध्ये नोंदणी करण्याची शेवटची मुदत आहे. यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.
रस्त्याची दुरवस्था
लांजा : जिल्हा वार्षिक योजनेतून १९ लाख २० हजार रुपये एवढा निधी खर्च करुन आंजणारी पूल ते निवसर मळा असा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, मान्सूनपूर्व झालेल्या पावसातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जानेवारी महिन्यात काम झाल्यानंतर केवळ चारच महिन्यात हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे.
अहवाल प्रलंबित
रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, या चाचण्यांची संख्या वाढल्याने त्यांचे अहवालही उशिरा येऊ लागले आहेत. काही चाचण्यांचे अहवाल तब्बल आठ दिवसांनंतरही आल्याचे अनेकदा घडले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार उशिरा होत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.
रिक्षावाल्यांना प्रतीक्षाच
रत्नागिरी : शासनाने लॉकडाऊनच्या काळात रिक्षावाल्यांना आर्थिक सहाय्य म्हणून १,५०० रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे साडेदहा हजार रिक्षा व्यावसायिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही रिक्षावाल्यांना ही आर्थिक मदत मिळाली नसल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे.
जंतूनाशकांची फवारणी
चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी गावात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने उपाययोजना हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. त्यानुसार आता गावात दुसऱ्यांदा जंतूनाशक औषधांची फवारणी सुरु झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीने जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे.
इमारती धोकादायक
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील टेरव येथील अंगणवाडीच्या दोन इमारती धोकादायक झाल्या आहेत. सध्या मुलांना सुट्टी असली तरीही शाळा सुरु झाल्यानंतर यात बसणाऱ्या चिमुकल्यांना या धोकादायक इमारतीमुळे अपघात होण्याची चिंता पालकांना सतावत आहे. याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
रुग्ण तपासणीवर भर द्या
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलावू लागला आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या चाचण्यांवर अधिकाधिक भर द्या, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला केल्या आहेत. तपासण्या वाढविल्यास कोरोनाबाधित होण्याचा दर कमी होणार आहे.
प्रशालेत वृक्षारोपण
चिपळूण : तालुक्यातील कोंढ्ये येथील रिगल सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पहिली ते नववीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे आपापल्या घराच्या परिसरात लावली.
व्यापारी आक्रमक
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. या बंद दुकानांचे मीटर रिडींग न घेता, त्यांना सरासरीप्रमाणे बिल देण्यात आले आहे. मात्र, वीजवापर न होताही बिल दुप्पटीहून अधिक आल्याने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
मान्सून आला जवळ
रत्नागिरी : केरळमध्ये आगमन झालेला मान्सून आता लवकरच कोकणातही दाखल होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच शनिवारपासून मान्सूनचा पाऊस लवकरच दाखल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
देवरुख : मुंबईतील स्पंदन फाऊंडेशनच्यावतीने तेऱ्ये गावातील २४ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या या कुटुंबांना रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. यासाठी रिचा वीरकर आणि मित्र परिवारातर्फे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
नांगरणीचे काम सुरु
पावस : गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावस परिसरातील गोळप भागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. नांगरणी आणि पेरणीच्या कामात बळीराजा व्यग्र होऊ लागला आहे. पंचक्रोशीत भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आहे.
वैद्यकीय साहित्याची मदत
साखरपा : मुर्शीचे सुपुत्र आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश लाड यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्याची देणगी दिली आहे. साखरपा ते देवळे या परिसरातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची विशेष सुविधा लाड यांनी उपलब्ध करुन दिली आहे.
अलगीकरण कक्ष
शिरगाव : चिपळूण तालुका महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने तालुक्यातील पोफळी ग्रामपंचायतीने गावातील कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज अलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाजेनको करमणूक केंद्र येथे ३० बेडची व्यवस्था असलेला कक्ष सुरु करण्यात आला आहे.