दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील माधवराव खांबेटे प्रशालेत राष्ट्रवादी काँग्रेस व जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आंजर्लेच्या सरपंच स्वप्नाली पालशेतकर, उपसरपंच मंगेश महाडिक, सदस्य प्रथमेश केळसकर आदी उपस्थित होते.
मत्स्यविभागाकडून मदत
रत्नागिरी : चिपळुणातील महापुरात अडकलेल्या ६० जणांची साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकातर्फे सुटका करण्यात आली. फायबर बोटीच्या माध्यमातून मदतकार्य करण्यात आले. हलक्या बोटी चालविणे अवघड बनले होते. तरीही मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने त्यासाठी पुढाकार घेतला.
भाज्यांच्या दरात वाढ
रत्नागिरी : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला जोडणारे सर्व मार्ग बंद असल्याने गेले काही दिवस भाजीपाला, दूध उपलब्धतेसाठी समस्या निर्माण झाली हाेती. आता कुंभार्ली, अणुस्कुरा घाट सुरू झाला असून, आंबा घाट छोट्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. आता भाज्यांची उपलब्धता होत असली तरी दर मात्र कमालीचे भडकलेले आहेत.
बिस्किटांची कमतरता
रत्नागिरी : चिपळूण शहर व परिसरातील गावांमध्ये महापुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याने मदतीचा महापूर सुरू झाला आहे. संस्था असो वा व्यक्ती यथाशक्ती मदत कार्यात गुंतले आहेत. बिस्किटे, फरसाण, लाडू शिवाय अन्य खाऊ, पाण्याच्या बाटल्या पूरग्रस्तांसाठी दिल्या जात असल्याने शहरात व ग्रामीण भागात सध्या बिस्किटांची कमतरता भासू लागली आहे.
पालकांना दिलासा
रत्नागिरी : शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांची उपलब्धता सेतू कार्यालयाकडून होते. शासनाच्या सूचनेनुसार सेतू कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना दिलासा प्राप्त झाला आहे. कोरोनामुळे बंद असलेले सेतू कार्यालय सुरू झाल्याने रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
जनजीवन पूर्वपदावर
राजापूर : पावसामुळे व पुरामुळे गेल्या आठवड्यात शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतली असून पाण्याची पातळीही ओसरली आहे. त्यामुळे नागरी जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पूरस्थितीत बाधित झालेल्या भातशेतीसह मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत.