रत्नागिरी : विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या रत्नागिरी विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीमध्ये शिबिर होणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अध्यक्षपदाचा राजीनामा
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली येथील पद्मनाभ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, राजापूर तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे. गेली तीन वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा
चिपळूण : तालुक्यातील कापरे व खरवते या प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष मीनल काणेकर यांनी दिली. दोन्ही आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका १५ वर्षांपेक्षा जुन्या आहेत.
वेतन वाढ रखडली
रत्नागिरी : कौशल्य विकास उद्योजकता विभागातील ३०९ कंत्राटी निदेशकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली तब्बल ११ वर्षे एकही रुपयाची पगारवाढ केलेली नाही. त्यामुळे कंत्राटी निदेशक, गटनिदेशकांची गैरसोय होत आहे. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
दळे येथे सर्वेक्षण
राजापूर : तालुक्यातील दळे येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या शुभारंभासाठी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, सरपंच महेश करंगुटकर, ग्रामसेवक गोरक्ष शेलार आदी उपस्थित होते.