दापोली : तालुक्यातील आसूद येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्रिवेणी संगम ग्रुपतर्फे डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आसूद गुरववाडी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच कल्पेश कडू, राकेश माने, पांडुरंग बांद्रे, विक्रांत बिवलकर उपस्थित होते.
पंचवीस लाखाचा निधी
रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ गावांना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनेसाठी २५ लाख ७० हजार ८९५ रुपयांचा निधी वितरित केला आहे. जागतिक बँकेकडून प्रोत्साहन अनुदानांतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरेदीसाठी गर्दी
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी व्यक्तींसाठी व संस्थांसाठी साहित्य विक्री करणारे सकाळी ७ ते ११ या वेळेतच उपलब्ध असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे.
प्राध्यापक प्रशिक्षण
खेड : तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल शाखेतर्फे आयोजित एक आठवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन दि्वतीय प्राध्यापक प्रशिक्षणाची सांगता झाली. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कर्नल बी. व्यंकट, आयएसटीईचे अध्यक्ष डाॅ. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. पन्नासपेक्षा अधिक प्राध्यापक सहभागी झाले होते.
लसीकरणासाठी आंबवचा पुढाकार
देवरुख : आंबव (कोंडकदम) ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्तच राहावा, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसीकरणाचे असलेले गैरसमज दूर करून घेत ग्रामस्थांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. सरपंच माधवी अधटराव, उपसरपंच रूपेश माने यांच्या नेतृत्वाखाली तुळसणी उपकेंद्रात १४० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
इंटरनेट सेवा विस्कळित
खेड : शहरासह ग्रामीण भागातील भारत संचार निगमची सेवा गेले काही ठप्प असल्याने शासकीय तसेच निमशासकीय कामांवर परिणाम झाला आहे. इंटरनेट सेवेअभावी कामांचा बोजवारा उडाला आहे. बँकांमध्ये तर ग्राहकांना कामासाठी खोळंबून राहावे लागत आहे. तातडीने ही सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
भाजावळीच्या कामांना वेग
रत्नागिरी : पेरणीपूर्व भात शेतीच्या मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. पेरणी करणाऱ्या क्षेत्राचे पालापाचोळा, कवळ, वाळलेले शेण टाकून भाजावळ करण्यात येत आहे. संचारबंदीमुळे माेजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत कामे उरकली जात आहेत.
पंप दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी शिवगणवाडी सुतारवाडी येथे जलस्वराज्य योजनेतून सुरू असलेली नळपाणी योजना गेली १० ते १२ वर्षे सुरू आहे. मात्र गेले १५ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तातडीने विद्युत पंपाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.