दापोली : मोदी सरकारच्या ७व्या वर्षपूर्तीनिमित्त सुरू असलेल्या कोविड काळातील सेवा सप्ताहानिमित्त दापोली तालुका भारतीय जनता पार्टी युवामोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन डेरवण येथील भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रक्तपेढी यांच्या सहकार्याने दापोलीतील राधाकृष्ण मंदिर सभागृहात करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ५० जणांनी रक्तदान केले. यावेळी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, भाऊ इदाते, अतुल गोंदकर, अजय शिंदे, स्वरूप महाजन, प्रसाद मांडवकर आदी उपस्थित होते.
अनाथ मुलांचा खर्च उचलणार
खेड : लाखोंचे जीव गेले, तरी अद्याप कोरोनाचे संकट कमी होत नाही. या कोरोना संसर्ग महामारीत जी मुले पोरकी झालेली आहेत, अशा मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च खेड जेसीज करणार असल्याची माहिती अध्यक्ष पराग पाटणे यांनी दिली. याबाबत आम्ही शासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून ही जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे, असे पाटणे यांनी सांगितले.
बससेवा विस्तारित करावी
आंजर्ले : दापोलीहून पाजपंढरीसाठी सुटणाऱ्या बसेस आंजर्ले राम मंदिरपर्यंत विस्तारित करण्यात याव्यात, असे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दापोली आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांच्याकडे दिले आहे. आंजर्ले ते आडेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरील रस्ता एका ठिकाणी खचला असल्याने, गेले वर्षभर दापोली केळशी या बसेस आंजर्लेमार्गे न जाता, बोरथळ आडेमार्गे जात असल्याने एसटीने आंजर्लेत जाणाऱ्या प्रवाशांना मुर्डी फाटा येथे उतरून आंजर्लेत जाण्यासाठी व दापोलीत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
सावरकर यांना अभिवादन
खेड : स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेणारे आणि ब्रिटिशांना वठणीवर आणणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने खेड नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगरसेविका नम्रता वडके, संजय आपटे, परशुराम पाथरे, संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मच्छीमारांच्या समस्या
दापोली : शहरात मासे विकण्यासाठी मच्छीमार समाजातील भगिनींना येणारी अडचण लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाजन यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. याबाबत ते म्हणाले की, शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मच्छीमार महिलांना मासेविक्रीसाठी प्रशासनाकडून प्रतिबंध केला जात होता. आधीच मच्छीचा दुष्काळ त्यात लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे, तेव्हा मच्छीमारांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि यातून मार्ग काढावा.
हळद लागवड प्रकल्प
मंडणगड : येथील पंचायत समितीतर्फे पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा नावीन्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. जिल्हा परिषद आणि मंडणगड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमान मंडणगड तालुक्यात प्रथमच हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून हळदीची ४० हजार रोपे प्रोट्रेमध्ये तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
गुहागर-चिपळूण बस सुरूच
रामपूर : जिल्हा प्रशासनाने ३ जूनपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेंतर्गत गुहागर-चिपळूण मार्गावर एसटी बस वाहतूक सुरू राहणार आहे. गुहागर-चिपळूण मार्गावर सकाळी ६ वाजता, ७ वाजता व ८ वाजता, सायंकाळी ४ वाजता व ६ वाजता गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर चिपळूण आगारातून गुहागरसाठी सकाळी ८ वाजता, ८.३० वाजता, १० वाजता, सायंकाळी वाजता व रात्री ८ वाजता गाड्या सोडण्यात येणार आहेत.
अन्नधान्याचे किट वाटप
दापोली : मोदी सरकारच्या ७व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे मच्छीमार समाजातील कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाजन, बुरोंडी माजी सरपंच बावा केळसकर, माजी सदस्य जनार्दन साखरकर, सदस्य अमर पावसे, कैलास केळसकर, अभिषेक हेदूकर, अनिकेत केळसकर आदी उपस्थित होते.
शेतीच्या कामांना वेग
चिपळूण : रामपूर-मार्गताम्हाने भागात ३० मेपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. दमदार पावसाच्या सरीमुळे शेत नांगरणे, भात बी पेरणी, मशागतीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. रामपूर या भागातील शेतीच्या कामांना वेग आला आहे.
शरद जाधव यांचा सत्कार
दापोली : दापोलीचे सुपुत्र व मंडळ अधिकारी मुरडव-संगमेश्वर म्हणून कार्यरत असणारे शरद जाधव हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, तहसीलदार थोरात यांच्या हस्ते तहसील कार्यालय देवरुख येथे सत्कार करण्यात आला. शरद जाधव यांनी उमरोली-मंडणगड येथून तलाठी म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली. त्यांनी दापोली तालुक्यात सर्वाधिक २५ वर्षे सेवा दिली.
केवळ ५ पॉझिटिव्ह
चिपळूण : येथील नगरपरिषदेचे नागरी आरोग्य सुविधा केंद्र पवन तलाव येथील केंद्रात काल बुधवारी २२ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पाच जण कोरोनाबाधित आढळले. मात्र, भाजी मंडई केंद्र व मोबाइल व्हॅनद्वारे ११८ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, ते सर्व निगेटिव्ह आढळले आहेत.
दोन वाड्यांना टँकरने पाणी
खेड : तालुक्यातील कशेडी-बंगलापाठोपाठ बोरटोक व थापेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षण केले. त्यानुसार, या दोन्ही वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाल्याने, तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरू होऊनही तालुक्यातील १९ गावे ३७ वाड्यांना एक शासकीय व चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
नगरपंचायतीत चाचणी
मंडणगड : येथील नगर पंचायतीच्या पुढाकाराने मंडणगड शहर व तालुक्यातील नागरिक, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकरिता कोविड चाचणी शिबिर घेण्यात आले. यावेळी १५० हून अधिक नागरिकांनी अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. मुख्याधिकारी विनोद डौले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले.
प्लास्टीक खरेदीसाठी गर्दी
लोटे : खेड तालुक्यातील लोटे येथील बाजारपेठेत प्लास्टीक खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. पावसाळापूर्व कामे आटोपण्याकरिता खोपटी, छप्पर, तसेच गाडीवरती टाकण्याकरिता प्लास्टीकच्या मागणीत वाढ झाली असून, खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडत आहे. काळे प्लास्टीक १३० रुपये किलो, निळे १४० रुपये तर सफेद १५० रुपये किलोने विकले जात आहे.