चिपळूण : कोरोनाची दुसरी लाट रोखतानाच राज्यात रक्ताच्या तुटवड्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेनेचे युवा नेतृत्व विक्रांत जाधव यांच्या पुढाकाराने युवा सेनेतर्फे सोमवारी (दि. १० मे) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील बांदल हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागातर्फे जिकिरीचे प्रयत्न सुरू असतानाच रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, तालुक्यात कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रक्तदान शिबिरातून संकलित होणारे रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते, या भावनेतून आणि राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते व शहर अधिकारी निहार कोवळे यांच्या पुढाकाराने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ‘एक थेंब रक्ताचा प्रश्न सुटेल जगण्याचा’ असे या शिबिराचे बोधवाक्य आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.