अडरे : सद्गुरु माता सुदिक्षा महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाच्या चिपळूण क्षेत्रांतर्गत मानव एकता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सेक्टर संयोजक रमाकांत खांबे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात ७० निरंकारी भक्तांनी रक्तदान केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना निरंकारी मिशनने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच कोरोना काळातही राजापूर, लांजा, मेघी, संगमेश्वर आणि रत्नागिरीहून आलेल्या रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रभर रक्ताची कमतरता निर्माण झालेली असताना निरंकारी मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराबद्दल डॉ. उत्तम कांबळे यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी रत्नागिरी सेवादल क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक उमेश भागडे, मेघी शाखेचे जयराम केसरकर, लांजाचे चंद्रशेखर बेंडखळे, संगमेश्वरचे नारायण पवार, राजापूरचे सिद्धेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे व इतर रक्त संकलित करणारे पथक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान मोटे यांनी केले.