मालवण : सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र करून काम केले जाणार आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा, पाँडेचरी, गुजरात, अंदमान निकोबार या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ब्ल्यू फ्लॅग बीच ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यातील किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग बीचमुळे जागतिक दर्जा प्राप्त होणार असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यटनमंत्री ठाकरे यांनी सोमवारी दुपारी येथील बंदरावरील नवीन उभारण्यात आलेल्या जेटीची पाहणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अरुण दुधवडकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हाप्रमुख संजय पड़ते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे यांनी नव्याने बांधलेल्या बंदर जेटीची पाहणी केली. त्यानंतर पालिकेच्या माध्यमातून रेवतळे येथे साकारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांच्यासमोर केले.
पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्नयावेळी ठाकरे म्हणाले, पर्यटकांसाठी नवी जेटी बांधण्यात आली आहे. पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गवर ये-जा करणे सोईस्कर होणार आहे. शिवाय त्यांना सुरक्षित सेवा मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पंचतारांकित हॉटेलसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक प्रस्तावही प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना आम्ही देत आहोत.