दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे खाडीच्या मुखाशी मासेमारी बोट बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. सुदैवाने बोटीवरील आठही मच्छिमारांनी पोहून किनारा गाठला. या बोटीला वाचविण्यासाठी गेलेली बोटही ओहोटीमुळे वाळूत रूतली होती. मात्र, त्याचदरम्यान भरती आल्यामुळे आणि किनाऱ्यावरील लोकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही बोट वाचली.
वासुदेव दोरकुलकर यांच्या मासेमारीसाठी गेलेल्या सिद्धीसागर बोटीचे इंजिन आंजर्ले येथे खाडीच्या मुखाशी बंद पडले. ओहोटी असल्याने मच्छिमारांना ती बोट किनाऱ्याकडे आणणे शक्य नव्हते. ही बाब किनाऱ्यावरील लोकांच्या लक्षात आल्यानंतर प्रकाश दोरकुलकर यांची एक बोट त्यांना वाचविण्यासाठी गेली. मात्र, ओहोटी असल्याने मदतीला जाणारी बोट वाळूत रूतली. त्यामुळे किनाऱ्यावरील लोकांनी दोरीच्या सहाय्याने या बोटीला वाचविण्याचे काम सुरू केले.
हा प्रकार होईपर्यंत वासुदेव दोरकुलकर यांची इंजिन बंद पडलेली बोट पाण्यात बुडू लागली. त्यावर आठ मच्छिमार होते. त्यांनी पाण्यात उडी घेऊन किनारा गाठला.
यादरम्यान भरती सुरू झाल्यामुळे वाळूत अडकलेली प्रकाश दोरकुलकर यांची बोटही सुटली आणि ती किनाऱ्यावर परत आणण्यात आली.
खाडीच्या मुखाशी गाळ साठल्याने वारंवार अशा दुर्दैवी घटनांना मच्छिमारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणचा गाळ काढावा, अशी मागणी मच्छिमार बांधव करत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी असा प्रकार या परिसरात घडला आहे. या घटनेचे वृत कळताच बंदर अधिकरी दीप्ती साळवी व काही अन्य अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.